Amit Shah In Arunachal: `भारताच्या जमीनीवर ताबा...`; भारत-चीन सीमेवर जाऊन आमित शाहांचं विधान
Amit Shah In Arunachal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आयटीबीपीच्या जवानांसमोर केलेल्या भाषणामध्ये थेट 2014 पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती याबद्दलची तुलना करत भाष्य केलं.
Amit Shah In Arunachal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज अरुणाचल प्रदेशमधून थेट चीनला आव्हान दिलं आहे. भारताच्या जमीनीवर ताबा मिळवण्याचा काळ निघून गेला आहे. भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. सुईच्या टोका एवढी जमीनीही आमच्याकडून कोणी घेऊ शकत नाही, असंही यावेळी शाह म्हणाले. भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या किबिथू प्रांतामध्ये व्हायब्रंट व्हिलेज योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये शाह बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पापासून केंद्र सरकारने देशाच्या सीमांजवळच्या गावांसाठी ही व्हायब्रंट व्हिलेज योजना सुरु केली आहे.
शाह काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळेस बोलताना भारतीय लष्कराचं तोंड भरुन कौतुक केलं. "संपूर्ण देश आज आपल्या घरांमध्ये निवांत झोपू शकतो कारण भारत-तिबेट सीमा पोलिसांचे (आयटीबीपी) जवान आणि आपलं लष्कर सीमांवर दिवसरात्र काम करत आहे. आज आम्ही गर्वाने सांगू शकतो की आमच्याकडे वाईट नजरेनं पाहण्याची कोणताही हिंमत नाही," असंही अमित शाह म्हणाले. "2014 च्या आधी आपल्या ईशान्येकडील प्रांताना अशांत प्रांत म्हणून ओखळलं जायचं. मात्र मागील 9 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींच्या 'लुक ईस्ट' धरोणामुळे ईशान्य भारताकडे आता एक असं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं जे देशाच्या विकासामध्ये योगदान देते," असंही अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.
गावांना मिळणार वीज
गृहमंत्री म्हणून अमित शाह यांचा ईशान्य भारतामधील राज्यांमधील हा पहिलाच दौरा आहे. अमित शाह यांच्या हस्ते आज राज्य सरकारच्या 9 मायक्रो हायड्रोलिक पॉवर प्रोजेक्टचं उद्घटान झालं. ही योजना 'स्वर्ण जयंती सीमा प्रकाश कार्यक्रमा'अंतर्गत राबवण्यात आली आहे. या योजनेमुळे सीमेजवळच्या गावांमध्ये राहणाऱ्यांना अधिक वीज मिळणार आहे. विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश), नूरानड (केरळ), शाह लिकाबाली (अरुणाचल प्रदेश), छपरा (बिहार) या ठिकाणी मूलभूत सुविधांच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा पोलिसांसाठी काम करणाऱ्या योजनांचंही उद्घाटन शाह यांच्या हस्ते झालं. यावेळेस गृहमंत्री किबितूमध्ये आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहे. उद्या गृहमंत्री नमती प्रांताला भेट देणार आहेत. ते वालॉग युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत.
चीनचा विरोध
काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचलमधील जागांना नवीन नावं देत असल्याची घोषणा केली होती. हा बदल भारताने फेटाळून लावला होता. या प्रकरणावरुन भारत आणि चीनमध्ये वाद सुरु असताना अमित शाह यांनी थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जाऊन चीनला आव्हान दिलं आहे. शाह यांच्या या दौऱ्याला चीनने विरोध केला आहे.