काश्मीरमध्ये लोकशाही आणि आनंद उरलेलाच नाही- गुलाम नबी आझाद
काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधारी गटाचे १००-२०० लोक सोडल्यास कुणीही आनंदात नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले. काश्मीर दौऱ्यावर असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी श्रीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये नैराश्य आणि तणावाचे वातावरण आहे. जम्मूतही तशीच परिस्थिती आहे. सत्ताधारी गटाचे १००-२०० लोक सोडल्यास कोणीही आनंदात नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गुलाम नबी आझाद यांनी स्थानिक प्रशासनावरही ताशेऱे ओढले. जगात मी कोठेही प्रशासनाची इतकी दहशत पाहिलेली नाही. आजच्या घडीला काश्मीरमध्ये लोकशाही उरलेलीच नाही, असे त्यांनी म्हटले.
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमध्ये जाण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना श्रीनगर विमानतळावरून परत पाठवण्यात आले.
याविरोधात गुलाम नबी आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर १६ सप्टेंबरला न्यायालयाने त्यांना काश्मीरमध्ये जाण्याची सशर्त परवानगी दिली होती. त्यानुसार सध्या ते काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीनगरमध्ये असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगितले. मला प्रसारमाध्यमांशी फार बोलायचे नाही. पण गेले चार दिवस मी काश्मीर खोऱ्यात राहिलो आहे. यावेळी मला बहुतांश ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. काश्मीरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट उरलेलीच नाही, असे आझाद यांनी सांगितले.