नोएडाच्या रस्त्यांवर टायर किलर्स, रॉंग साइडने गाडी आणल्यास टायरचा स्फोट
नोएडाच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांसाठी `टायर किलर्स` लावले जाणार आहेत.
नवी दिल्ली : सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, भरधाव वेगाने गाडी चालवणे अशा प्रकारे वाहन नियमांचे उल्लघंन सर्रासपणे सुरू असते. यावर चाप बसण्यासाठी वाहतूक पोलीस कठोर नियम आणत असतात. पुण्यासारख्या शहरात हेल्मेट सक्ती करण महाराष्ट्र वाहतूक पोलिसांना शक्य होत नाही आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी नियमांना बगल देणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्याची तयारी केली आहे. ट्रॅफिक नियम तोडल्याने इथे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नोएडा पोलीस प्रशासनाने एक नवी शक्कल लढवली आहे. आता नोएडाच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांसाठी 'टायर किलर्स' लावले जाणार आहेत. खरंतर ही शक्कल आधी पुणे पोलिसांनी लढवून झाली आहे. पण वाढत चाललेल्या अपघातांमुळे त्यांना आवरत घ्याव लागल होतं.
टायर किलर्स हा स्पीड ब्रेकर प्रमाणे असतो. लहान लोखंडी पट्ट्या रस्त्याच्या मधोमध पहायला मिळतील. या अगदी स्पीड ब्रेकर सारख्या असतील आणि यालाच टायर किलर्स म्हटलं जातं. जर तुम्ही सरळ दिशेने गाडी चालवत असाल तर काहीच अडचण नाही. पण तुम्ही रॉंग साईडने गाडी नेल्यास तुमच्या गाडीचा टायर ब्लास्ट होऊ शकतो.
याआधी टायर किलर्स पुण्यामध्ये लावण्यात आले होते. जिथे चुकीच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांच्या चाकांचे ब्लास्ट व्हायचे. टायर किलर्समुळे पुण्यात अनेक अपघाताच्या घटनाही झाल्या. सलग वाढत चाललेल्या अपघाताच्या घटनांमुळे पुण्यातील रस्त्यांवरून हे टायर किलर्स हटवण्यात आले.
नोएडाच्या रस्त्यांवर टायर किलर्स लावण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हे टायर किलर्स नोएडाच्या सेक्टर 74 च्या रस्त्यांवर लावले गेले आहेत. शहरातील अन्य 5 ठिकाणीही हे लवकरच लावले जाणार आहेत. सेक्टर 74 शिवाय सेक्टर 76, सेक्टर 77 नॉर्थ आय, सेक्टर 51 यू टर्न जवळ आणि सेक्टर 75 मध्ये मेट्रो स्टेशन जवळ लावण्यात येणार आहे.