भाजप नेत्याची गोळी मारून हत्या
दिल्ली जवळच्या नोएडा जिल्ह्यातल्या बिसरख क्षेत्रामध्ये भाजप नेता आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.
नोएडा : दिल्ली जवळच्या नोएडा जिल्ह्यातल्या बिसरख क्षेत्रामध्ये भाजप नेता आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे. भाजप नेते शिवकुमार यादव यांचा हैबतपूर गावामध्ये प्रॉपर्टीचा बिजनेस होता. याचबरोबर गावामध्ये त्यांच्या दोन खासगी शाळाही होत्या. गुरुवारी शाळेतून घरी जात असताना तिगरी मोडजवळ काही अज्ञातांनी शिवकुमार यादव यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.
शिवकुमार यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले हल्लेखोर बाईकवर आले होते. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर शिवकुमार यादव यांच्या गाडीचा तोल गेला आणि डिवायडरला जाऊन आपटली. यादरम्यान गाडीच्या मध्ये एक मुलगी आल्यामुळे तिचाही मृत्यू झाला.
गोळीबार झाल्यानंतर शिवकुमार यांना नोएडाच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर त्यांच्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना गाझियाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरु असताना डॉक्टरांनी शिवकुमार आणि सुरक्षा रक्षक बलीनाथला मृत घोषीत केलं. तर रईसपाल या सुरक्षा रक्षकाची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
शिवकुमार गाझियाबादच्या कृष्ण नगर भागातले भाजपचे विभागीय अध्यक्ष होते. शिवकुमार यांच्या काकांसोबतच परिवारातल्या दोघांची याआधी हत्या झाली आहे. तर हैबतपूरमध्ये झालेल्या एका हत्येप्रकरणी शिवकुमार यांना जेलमध्ये जावं लागलं होतं.