फक्त फडणवीसच नाही, हा नेताही अमित शाहंच्या भेटीला, `ऑपरेशन लोटस`च्या हालचाली?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या या भेटीनंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. फडणवीस यांनी मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसंच सरकार पाडण्यात रस नसल्याचं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीवर विरोधकांकडूनही प्रतिक्रिया सुरू झाल्या. महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष टिकेल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते तसंच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला. तर भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्यामुळे फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं आणि आम्ही एक आहोत, असं पक्षश्रेष्ठींना सांगावं लागल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
'काळजी करू नका, फडणवीसांच्या हातात काहीच लागणार नाही'
'फवारणीचे पंप घेऊन फिरतोय, त्यामुळे...', फडणवीसांच्या दिल्ली भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया
अमित शाह यांना आणखी एक नेता भेटला
शुक्रवारी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच आणखी एका नेत्यानेही अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतरही पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली. झारखंडमधले भाजपचे नेते बाबूलाल मरांडी यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीनंतर झारखंडमध्येही महाराष्ट्राप्रमाणेच पडसाद उमटले.
भाजपचं षडयंत्र झारखंडमध्ये चालणार नाही, अशी प्रतिक्रिया झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. तसंच राजस्थानसारखी परिस्थिती झारखंडमध्ये करण्याचा प्रयत्न झाला, तर भाजपला विरोधी पक्षनेताही बनवता येणार नाही, असा इशारा हेमंत सोरेन यांनी दिला.
बाबूलाल मरांडी जर अमित शाह यांना भेटले असतील, तर ते नक्कीच काही टास्क घेऊन गेले असतील आणि काही टास्क घेऊन परत आले असतील, असं वक्तव्य झारखंड आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष अभय सिंग म्हणाले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या इशाऱ्यावर झारखंड प्रदेश भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला विरोधी पक्षनेतेपद खिरापत म्हणून मिळालेलं नाही. अमित शाह आमचे नेते असल्यामुळे बाबूलाल मरांडी त्यांची भेट घेण्यासाठी गेले. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. मरांडी यांनी झारखंडच्या परिस्थितीची माहिती अमित शाह यांना दिली, असं प्रत्युत्तर भाजपने दिलं.