'...म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं', यशोमती ठाकूर यांचा पुन्हा निशाणा

महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

Updated: Jul 17, 2020, 10:42 PM IST
'...म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं', यशोमती ठाकूर यांचा पुन्हा निशाणा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे. 'आमच्या संपर्कात भाजपच्या १०५ आमदारांपैकी काही आमदार असल्याची बातमी बाहेर आल्यानंतर फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं,' असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. 

'आम्ही एक आहोत, असं स्पष्टीकरण त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना द्यावं लागलं, पण त्यांच्या समर्थनासाठी पुढे कोण आलं? राम कदम, प्रविण दरेकर, प्रसाद लाड. समर्थनासाठी पुढे आलेली ही मंडळी मुळात भाजपची आहेत का?' असा सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. 

'विरोधी पक्षनेते एकटे पडले आहेत, असं चित्र आहे आणि मूळ भाजपची मंडळी घरातच बसलेली आहेत. महाराष्ट्रात उलटा चमत्कार होणार ही वास्तविकता आहे,'अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या यशोमती ठाकूर?

दरम्यान यशोमती ठाकूर यांनी कालही भाजपवर निशाणा साधला होता. 'महाराष्ट्रात सरकार स्थिर आहे, उलट भाजपच्या १०५ आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नाव कळली तर राज्यात भूकंप येईल,' असा खळबळजनक दावा यशोमती ठाकूर यांनी केला होता. 

'कार्यकर्ते महाराष्ट्रात काय होईल, हे सतत विचारत असतात, पण माझं सगळ्यांना सांगणं आहे, राज्यातलं सरकार स्थिर आहे. कोणीही हे सरकार अस्थिर केल्याचा प्रयत्न केला, तर गाठ माझ्याशी आहे. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. आमचे कुणीही फुटणार नाही, उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत,' असं यशोमती ठाकूर काल म्हणाल्या होत्या.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाहंच्या भेटीला