नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानात जाणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. भाविकांचा पहिला जथ्था केवळ कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाऊन दर्शन घेईल. यामध्ये अमरिंदर सिंग यांच्यासह मनमोहन सिंग आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही समावेश आहे. मात्र, कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला कोणीही उपस्थित राहणार नाही, असे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही तासांपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारून कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला जाणार असल्याच्या बातम्या फिरत आहेत. मात्र, हे वृत्त चुकीचे असून डॉ. मनमोहन सिंग यांचा तसा कोणताही इरादा नसल्याचेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले. 


आम्ही पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणे आणि पाकिस्तानामध्ये जाण्यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे अमरिंदर सिंह यांनी म्हटले. 


९ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडोअर भाविकांसाठी खुला होईल. या मार्गिकेमुळे कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि गुरूदासपूर येथील डेरा बाबा नानक जोडले जाणार आहेत. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५२२ मध्ये कर्तारपूर साहिब दर्ग्याची स्थापना केली होती. कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.