वाराणसी : वाराणसीमधील (varanasi) काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिरात दर्शन घेण्यासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. विशेष कपड्यांमध्येच बाबा विश्वनाथ यांचं दर्शन घेता येणार आहे. पण हा ड्रेस कोड केवळ स्पर्श दर्शन करणाऱ्या भक्तांसाठीच लागू करण्यात आला आहे. स्पर्श दर्शन न करणाऱ्या भक्तांसाठी ड्रेस कोड आवश्यक नसणारेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या नियमानुसार, काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शन करणाऱ्या महिलांसाठी साडी हा ड्रेस कोड असणार आहे. तर पुरुषांसाठी धोती-कुर्ता घालणं अनिवार्य असेल. 


रविवारी रात्री, काशी विद्वत परिषदेच्या (Kashi Vidwat Parishad) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत भक्त, काशी विश्वनाथाचं स्पर्श दर्शन करु शकणार आहेत. पॅन्ट, शर्ट, जीन्स असे कपडे घातलेले भक्त दुरुनच दर्शन घेऊ शकतात. हा नवा ड्रेस कोड कधीपासून सुरु करण्यात येणार याबाबत सांगण्यात आलं नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच हा नियम लागू करण्यात येणार आहे.


दरम्यान, उज्जैनच्या महाकाल मंदिरातही हा नियम लागू आहे. याच धर्तीवर काशी विश्वनाथ मंदिरातही ड्रेस कोडनुसारच, स्पर्श दर्शन करण्यासाठी अनुमती दिली जाणार आहे.