लखनऊ: उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात यापुढे भटक्या गायींचा सांभाळ करण्यासाठी अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील सर्व भटक्या गायींना जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. याठिकाणी तुरुंगातील कैदी त्यांचा सांभाळ करतील. लखनऊ महानगरपालिकेचे आयुक्त अनिल गर्ग यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशात प्रत्येक तुरुंगात किती मोकळी जागा याबाबतची माहितीही मागवण्यात आली आहे. या मोकळ्या जागांवर गो सेवा केंद्रे उभारण्यात येतील. या जागेत गायींच्या चाऱ्यासाठी गवताची लागवड करण्यात येईल. तसेच तुरुंगातील गायींपासून मिळणाऱ्या दुधाची बाजारपेठेत विक्री केली जाईल. तुरुंगातील इतर कामांप्रमाणे यासाठी कैद्यांना भत्ता मिळेल. लखनऊच्या गोसाईगंज कारागृहात अशाप्रकारचा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला होता. गोसाईगंज तुरुंगात एकूण ४० गाई आहेत. कैदी या गायींची देखभाल करतात. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व तुरुंगांमध्ये ही योजना राबविण्याचा पालिका आयुक्तांचा मानस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाईंच्या संवर्धनासाठी दारुवर लागणार 'काऊ सेस'


लखनऊ शहरातील नागरिकांना मोकाट जनावरांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा ही मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध फिरत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत अनेकदा मोकाट गायींच्या देखभालीसाठीच्या योजनांवर भाष्य केले आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतही गायींना सांभाळण्यासाठी कल्याणकारी प्रकल्प राबवले जात आहेत. 


उद्योगधंदे काय उभारता, गाय पाळा; बक्कळ पैसा कमवाल- बिप्लब देव


यापूर्वी त्रिपुरात मुख्यमंत्री बिपल्ब देव यांनी राज्यातील ५००० कुटुंबांना रोजगार म्हणून गायींचे वाटप करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना बिप्लब देव यांनी म्हटले की, रोजगार निर्मितीसाठी मोठे उद्योगधंदे उभारायचे झाल्यास जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक करावी लागते. यामधून फारतर २००० लोकांनाच रोजगार मिळू शकतो. याउलट ५००० कुटुंबांना १० हजार गायी दिल्या तर अवघ्या सहा महिन्यांत त्यांना उत्पन्न मिळायला सुरुवात होते, असे बिप्लब देव यांनी म्हटले होते.