Crime News : वृद्धापकाळात मुलं मुली ही आई वडिलांचा आधार असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून वृद्ध आई वडिलांवर त्यांच्याच मुलांकडून अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सुनांकडून अनेकदा त्यांच्या सासूला मारहाण केल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशातच एका निर्दयी मुलाने आईला विजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याचे समोर आलं आहे. मारहाणीचे कारण ऐकून देखील अनेकांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशातील केओंझार जिल्ह्यातून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ओडिशात एका व्यक्तीने त्याच्या 70 वर्षीय आईला बेदम मारहाण केल्याचे समोर आलं आहे. एवढ्यावरच न थांबता निर्दयी मुलाने आईला विजेच्या खांबाला बांधून ठेवलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला तुरुंगात पाठवलं आहे.


ओडिशातील केओंझार जिल्ह्यात एका मुलाने आपल्या 70 वर्षीय आईला बेदम मारहाण केली. यानंतर तिला विजेच्या खांबाला बांधण्यात आले. खांबाला बांधलेल्या वृद्ध महिलेचा फोटोही समोर आला आहे. वृद्ध आईचा दोष एवढाच होता की तिने आपल्या मुलाच्या शेतातून फ्लॉवर तोडला होता. या सगळ्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे जाऊन महिलेला सोडवलं. त्यानंतर मुलाला अटक केली आहे.


केओंझार जिल्ह्यातील सरसपासी गावात राहणाऱ्या पीडित 70 वर्षीय महिलेला दोन मुले होती. त्यातील मोठा मुलगा काही वर्षांपूर्वी वारला होता. यानंतर कौटुंबिक वादातून वृद्ध महिला एकटीच राहू लागली. सरकारी रेशनवर आणि गावकऱ्यांच्या मेहरबानीवर अवलंबून असलेल्या या महिलेकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. पैशांची नितांत गरज असलेल्या वृद्ध महिलेने मुलगा शत्रुघ्न महंतच्या शेतातून फ्लॉवर तोडून तो खाल्ला.


शत्रुघ्न महंतला हा सगळा प्रकार कळताच त्याला संताप अनावर झाला. शत्रुघ्न आईला याबाबत जाब विचारायला गेला. यानंतर आई आणि मुलामध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादाला हिंसक वळण लागल्यावर शत्रुघ्नने आईला विजेच्या खांबाला बांधले. त्यानंतर तिला बेदम मारहाण केली. शत्रुघ्न महंतच्या या क्रूर कृत्याचा व्हिडिओ आणि फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.


वृद्ध महिलेची प्रकृती खालावल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दुसरीकडे मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनाही शत्रुघ्न महंतने धमकावले होते. पोलिसांनाही तात्काळ रुग्णालयात पोहोचून वृद्ध आईचा जबाब नोंदवून घेतला. चौकशीअंती मुलावरील आरोप प्रथमदर्शनी खरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे महंत यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्ही त्याला अटक केली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.