Man Got Suspended For Selfie With Helicopter: देशातील अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबद्दल यंत्रणा आणि सरकार कायमच गंभीर असते. त्यामुळेच या व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये काही गोंधळ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. मात्र ओदिशामधील एका सरकारी अधिकाऱ्याची नोकरी केवळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हेलिकॉप्टरबरोबर फोटो काढल्याने गेली. आधीच द्रौपदी मुर्मू यांचा ओदिशा दौरा त्यांच्या कार्यक्रमात करण्यात आलेल्या वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन चर्चेत असतानाच आता या नव्या प्रकरणाची भर त्यात पडली आहे. 


कोण आहे नोकरी गेलेली व्यक्ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयूरभंज जिल्ह्याचे मुख्य जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीडीएमओ) राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरबरोबर फोटो काढणाऱ्या एका फार्मासिस्टला निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. एका अधिकाऱ्यानेच यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रुपभानु मिश्रा यांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरबरोबर सेल्फी काढण्याचा मोह न आवरल्याने नोकरी गमावणाऱ्या फार्मासिस्टचं नाव जशोबंत बेहरा असं आहे.


या कर्मचाऱ्याचं म्हणणं काय?


समोर आलेल्या माहितीनुसार, जशोबंत बेहरा हे 5 मे रोजी सिमिलीपाल नॅशनल पार्कच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबतच्या आरोग्य पथकामधील सदस्य होते. याच दौऱ्यादरम्यान बेहरा यांनी राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरबरोबर काही सेल्फी क्लिक केले आणि नंतर ते फेसबुकवर शेअर केले. "मी एक आठवण म्हणून काही फोटो माझ्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले होते. हे फोटो शेअर करण्यामागे माझा कोणताही वाईट उद्देश नव्हता. मी हे फोटो काढताना हेलिकॉप्टरजवळ असलेल्या वायूसेनेच्या अधिकाऱ्यांची तोंडी परवानगी घेतली होती," असा दावा बेहरा यांनी केला आहे.


फोटो डिलीट केले


"राष्ट्रपतींसारखी मोठी व्यक्ती आमच्या जिल्ह्यात आली होती. मला हेलिपॅडजवळच्या वैद्यकीय पथकामध्ये नियुक्त करण्यात आल्याने आठवण म्हणून मी ते फोटो क्लिक केलेले," असंही बेहरा म्हणाले. बेहरा यांनी त्यांच्या खासगी मोबाईल फोनवरुन हे फोटो क्लिक केले होते. मात्र या प्रकरणावरुन वाद निर्माण झाल्यावर आपण फेसबुकवरुन हे फोटो डिलीट केल्याचंही बेहरा यांनी म्हटलं आहे. 


9 मिनिटं राष्ट्रपती अंधारात


ओदिशामधील महाराजा श्रीरामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रपती मुर्मू उपस्थित असतानाच कार्यक्रमातील वीजपुरवठा खंडित झाला. याच मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा उचलून धरला आहे. राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला जाहीर कार्यक्रमामध्ये 9 मिनिटं वीजपुरवठ्याशिवाय अंधरात रहावं लागल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे.