Odisha Train Accident : ओडिशातल्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात (Balasore Railway Accident) 288 प्रवाशांना जीव गमवावा लागला. मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाने (TMC) राज्यातील पीडितांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली. या मदतीवरुन आता पश्चिम बंगालमध्ये (West Bangal) भाजप (BJP) आणि टीएमसी आमने सामने आले आहेत. पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजूमदार यांनी टीमसीवर गंभीर आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृणमुल काँग्रेसच्या एका मंत्र्याने मदतीच्या नावाखाली मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांच्या नोटांचं वाटप केल्याचा दावा सुकांत मुजूमदार यांनी केला आहे. सुकांत मुजूमदार यांनी या पैशाचा स्रोत काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. याचा एक व्हिडिओ सुकांत मुजूमदार यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओत काही महिला चटईवर बसलेल्या आहेत आणि त्याच्या हातात दोन हजार रुपयांच्या नोटांचं बंडल ठेवण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ ट्विट करत सुकांत मुजूमदार यांनी काळा पैसा पांढरा करण्याची टीएमसीची ही नवी पद्धत असल्याचा आरोप केला आहे. 


दोन हजारांच्या नोटा कुठून आल्या?
ममदा बॅनर्जी यांच्या आदेशावरुन राज्यातील एका मंत्र्याने पीडित कुटुंबियांना तृणमुल काँग्रेस पक्षातर्फे मदत म्हणून 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचं वाटप केलं. या गोष्टीचं आम्ही प्रशंसा करतो. पण यांच्याकडे 2000 रुपयांच्या इतक्या नोटा आल्या कुठून, या पैशाचं स्त्रोत काय आहे? असा सवाल सुकांत मुजूमदार यांनी उपस्थित केला आहे. वर्तमान परिस्थितीत बाजारात 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात कमी आहेत. बँकांकडून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशात मृतांच्या कुटुंबियांना दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन त्यांच्या अडचणीत वाढ केली जात आहे असा सवालही सुकांत मुजूमदार यांनी उपस्थित केला आहे. 


टीएमसीचा पलटवार
भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजूमदार यांनी केलेल्या आरोपांना सत्ताधारी तृणमुल काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. सुकांत मुजूमदार यांचे आरोप निराधार असल्याचं टीएमसीचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी म्हटलं आहे.  ज्या भाजप सरकारने दोन हजारांची नोट देशात आणली ती 2 हजारची नोट अमान्य आहे का? असा उलट सवाल कुणाल घोष यांनी उपस्थित केला आहे. 2 हजार रुपयांची नोट म्हणजे ब्लॅक मनी नाही असंही कुणाल घोष यांनी सांगितलं.
 
ओडिशा ट्रेन अपघातात 288 प्रवाशांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पश्चिम बंगालमधल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत म्हणून टीएमसी नेता अभिषेक बॅनर्जी यांनी 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.