ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही महागात महाग कोणतं गिफ्ट दिलंयत ? महागड्या हॉटेलात पार्टी किंवा एखादी हिऱ्याची अंगठी किंवा असंच काहीतरी.. पण राजस्थानातील एका अवलियानं आपल्या पत्नीला असं गिफ्ट दिलंय, की तुम्ही ऐकून थक्क व्हाल. प्रेमात वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात. अगदी चंद्र-तारे आणून देण्याच्या आणाभाकाही घेतात... पण बहुतेक कुणालाच हे आश्वासन पाळता येत नाही... अपवाद फक्त या महाभागाचा... यांचं नाव आहे धर्मेंद्र अनिजा. मुळचे राजस्थानच्या अजमेरचे राहणारे. सध्या नोकरीनिमित्त ब्राझिलमध्ये असतात. लग्नाच्या ८व्या वाढदिवसाला त्यांनी आपल्या लाडक्या बायकोला चक्क चंद्र दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेंद्र यांनी पत्नी सपनासाठी चंद्रावर जमीन खरेदी केलीये. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या लुनार सोसायटी इंटरनॅशनल या कंपनीकडून त्यांनी चंद्रावरील 3 एकर जमीन खरेदी केलीये.



अजमेरमध्ये लग्नाच्या 8 व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होतं... केक कापून झाल्यानंतर धर्मेंद्र यांनी चक्क चंद्रावरील जमिन खरेदीचं प्रमाणपत्र सपना यांना प्रेझेंट केलं... यानं तमाम पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का बसला नसता तरच नवल.


आता तुम्ही प्रेमात आकंठ बुडाले असाल तर त्या नादात कुणाला चंद्राचा तुकडा आणून देण्याचं कबुल करून बसू नका. धर्मेंद्र अनिजा यांच्यासारखी चंद्राची खरेदी सर्वांना जमेलच असं नाही.