४०,००० ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती झाली चोरी, यामध्ये तुमचं नाव तर नाही ना?
चायनीज स्मार्टफोन कंपनी वन प्लस (OnePlus)चे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन कंपनी वन प्लस (OnePlus)चे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
स्वत: OnePlus ने या बातमीला दुजोरा दिला आहे. कंपनीची वेबसाईट oneplus.net हॅक केली होती. त्यानंतर या ठिकाणाहून जवळपास ४० हजार क्रेडिट कार्ड ग्राहकांची माहिती लीक झाली होती.
कंपनीच्या मते, ज्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याची शक्यता आहे अशा सर्व ग्राहकांना ई-मेल पाठविण्यात आला आहे.
कंपनीने ग्राहकांना दिला सल्ला
चीनी कंपनी वन प्लसने आपल्या ग्राहकांना सल्ला देत सांगितलं की त्यांनी आपल्या क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट चेक करावं. जर ग्राहकांना काही व्यवहार संशयास्पद वाटत असतील तर त्याची माहिती तात्काळ कंपनीला द्यावी.
इतकचं नाही तर, वन प्लसच्या सपोर्ट टीमकडूनही ग्राहक मदत घेऊ शकतात. कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी काम करत असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
क्रेडिट कार्डचं पेमेंट बंद
वन प्लसने आपल्या ४०,००० ग्राहकांची क्रेडिट कार्ड माहिती चोरी झाल्याचं कळताच क्रेडिट कार्ड पेमेंट सुविधा बंद केली आहे. कंपनीच्या मते, ऑनलाईन स्टोअर प्रोडक्ट खरेदी करताना कुठलाही कस्टमर क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करु शकणार नाही. चौकशी पूर्ण होईपर्यंत हा पेमेंट पर्याय बंद ठेवण्यात येणार आहे.
हे युजर्स झाले प्रभावित
कंपनीच्या मते, नोव्हेंबर २०१७ ते ११ जानेवारी २०१८ या दरम्यान वेबसाईटवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून नवी माहिती ज्यांनी अपलोड केली आहे त्याच युजर्स प्रभावित झाले आहेत.