नवी दिल्ली : हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. अखेर कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय जाहीर केलं. एकीकडे कांद्याचे दर घसरलेत त्यात येत्या मार्च महिन्यात कांद्याचं उत्पादन तब्बल ४० लाख मेट्रीक टनापर्यंत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ६ महिन्यांआधी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या पावसाच्या हंगामात लांबलेला पाऊस आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते.


कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये मंदावल्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नव्हता, त्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला ११ हजार १११ रुपये एवढा ऐतिहासिक भाव मिळाला होता. कांद्याचे हे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. कांद्यांचे भाव पडल्यानंतर आणि उत्पादन वाढल्यानंतर शेतकरी आणि बाजार समितीकडून निर्यातबंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती.