मुंबई : कांद्यानं शंभरी गाठल्यानं सामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. दिल्लीसह अनेक ठिकाणी कांद्याचे भाव १०० रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. 'एमएमटीसी' या सरकारी मालकीच्या व्यापार संस्थेद्वारे परदेशातून कांदा आयात करण्यात येणार असून नाफेडमार्फत त्याचा देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारपेठेतील कांद्याची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उपाहारगृहे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांना कांदा देण्यास नकार दिला आहे. भाववाढीमुळे ग्राहकांच्या ताटात कांदा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच कांद्याचा दर वाढल्याने महिलांच किचन बजेट देखील कोलमडलं आहे. 


किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ८० ते १०० रुपये प्रतिकिलो झाला असून कांदा बंद केला आहे. कांद्याला पर्याय म्हणून कोबी आणि मुळा वापरला जात असल्याचं समोर येत आहे. कांद्याच्या भाववाढीमुळे लहान खाद्यपदार्थ विक्रेते तर अडचणीत सापडले आहेत. अंडाभुर्जी, कांदा भजी, मिसळ यांसारख्या पदार्थावरही कांद्याच्या भाववाढीचा परिणाम झाला आहे. 


किरकोळ आणि घाऊक बाजारातही कांद्याचे दर लक्षणीयरित्य वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे नाशिक आणि जुन्नर या कांद्याची निर्यात केल्या जाणाऱ्या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. ज्याचे पडसाद दरवाढीमध्ये उमटल्याचं दिसत आहे. 



दैनंदिन जीवनात स्वयंपाकामध्ये, विविध पदार्थ बनवतेवेळी कांद्याचा सर्रास वापर केला जातो. पण, आता मात्र कांद्याचे हे वाढलेले दर सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लावणार असंच चित्र आहे. मुळात अनेकांच्या खर्चाची आखणीही या वाढीव दरांमुळे बिघडणार आहे.