नवी दिल्ली : भारतीय यात्रेकरूंसाठी पाकिस्तान स्थित पवित्र स्थळ शीख गुरुद्वारा करतापूर साहेब  (Kartarpur Sahib) जाण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार होती. परंतु, सध्या हे रजिस्ट्रेशन स्थगित करण्यात आलंय. पवित्र गुरुद्वाराला भेट देण्यासाठी भारतीयांना रविवारपासून रजिस्ट्रेशनची सोय उपलब्ध होणार होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करतारपूर साहेब गुरुद्वारा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात स्थित आहे. डेरा बाबा नानक सीमेपासून जवळपास ४.५ किलोमीटर अंतरावर हे गुरुद्वारा आहे. हे गुरुद्वारा शीख समुदायासाठी पवित्र ठिकाण मानलं जातं. गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्यातील १८ वर्ष आणि आपला अंतिम वेळही इथंच व्यतीत केला. 


४.२ किलोमीटर लांब करतारपूर कॉरिडोरचं  (Kartarpur Corridor) निर्माण शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीपूर्वी एक आठवडा अगोदर म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असं लँड पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाचे (LPSI) अध्यक्ष गोविंद मोहन यांनी म्हटलंय. 



हा कॉरिडोर प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर ५००० लोक या गुरुद्वाराला भेट देऊ शकतील आणि त्याच दिवशी परत भारतात येऊ शकतील. भारतीय प्रवाशांना ज्या दिवशी सीमा पार करतील त्याच दिवशी करतापूर तीर्थस्थळाचं दर्शन घेऊन पुन्हा भारतात परतावं लागेल, असं एलपीएआय प्रमुखांनी स्पष्ट केलंय. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) ८ नोव्हेंबर रोजी बहुप्रतीक्षित 'करतारपूर कॉरिडोर'च्या भारतीय भागात उद्घाटनं करणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानही आपल्या बाजुनं करतारपूर कॉरिडोरचं आपल्या भागाचं उद्घाटन करणार आहे.