Join Indian Army: लष्करात भरती होऊन देशाची सेवा करणाऱ्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने 10+2 तांत्रिक प्रवेश योजना 53 चं नोटिफिकेशन जारी केलं आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आण पात्र उमेदवार भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाईट  joinindianarmy.nic.in च्या माध्यमातून अर्ज करु शकतात. 12 वी उत्तीर्ण JEE-Mains दिलेल्या उमेदवारांची अर्ज करण्याची ही चांगली संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सैन्य भरती मोहिमेद्वारे (तांत्रिक प्रवेश योजना 53) एकूण 90 रिक्त जागा भरल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचं प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर अभियांत्रिकी पदवीसह लेफ्टनंट पद आणि स्थायी कमिशन दिले जाईल. हा कोर्स जुलै 2025 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे सुरू होईल.


कोण करु शकतं अर्ज


मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) सह 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असणं आवश्यक आहे. तसंच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE Mains 2024 दिली असावी. वयाच्या अटीबद्दल बोलायचं गेल्यास पात्र अर्जदारांचे वय 1 जुलै 2025 रोजी कमीत कमी 16 वर्षं आणि कमाल 19 असावं.


निवड प्रक्रिया कशी असेल?


पात्र अर्जदारांना SSB मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल. शॉर्टलिस्टसाठी गुणांचा कट ऑफ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाईल. SSB मुलाखती जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत चालतील. तथापि, मुलाखतीची तारीख निवडण्याची संधी डिसेंबरमध्ये ऑनलाइन विंडोद्वारे दिली जाईल.


स्टायपेंड किती असेल?


चार वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान, उमेदवारांना 56100 रुपये प्रशिक्षण स्टायपेंड मिळेल. यानंतर, आयोग प्राप्त उमेदवारांना वेतन स्तर-10 अंतर्गत 17 ते 18 लाख रुपये (वार्षिक) दिले जातील. 


अर्ज कसा करायचा?


1: सर्वप्रथम भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
2: होम पेजवरील  'Officer Entry Apply/Login' वर क्लिक करून नोंदणी करा.
3: आवश्यक कागदपत्रं अपलोड करा आणि फी जमा करा.
4: तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल, पुढील वापरासाठी त्याची हार्ड कॉपी सोबत ठेवा.