पाटणा: श्रावण आणि भाद्रपद या महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी ही येणे क्रमप्राप्तच आहे. मात्र, यावेळी विरोधक उगाचच देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहेत, असे वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतेच. मात्र, यावेळी काही राजकीय पक्ष त्याचा मोठा गवगवा करत आहेत. निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर या पक्षांना नैराश्य आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार सुरु असल्याची टीका सुशीलकुमार मोदी यांनी केली. 


२०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ५ टक्के इतके असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. ही गेल्या आठ वर्षांमधील निच्चांकी पातळी आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. 


मात्र, सुशीलकुमार मोदी यांनी याची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले. केंद्र सरकारने यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील, असा दावाही मोदी यांनी केला. 



तसेच या आर्थिक मंदीचा बिहारवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले. बिहारमधील वाहननिर्मिती क्षेत्राची वाटचाल पूर्वीप्रमाणेच सुरु आहे. केंद्र सरकार आता लवकरच तिसऱ्या पॅकेजची घोषणा करेल, असा विश्वासही सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केला. 


तत्पूर्वी रविवारीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. गेल्या तिमाहातील पाच टक्के इतका विकासदर आपण मोठ्या आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे द्योतक असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.


मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मात्र या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. सरकार मंदीला क्षेत्रानुसार आणि त्या क्षेत्रांच्या गरजांवर आधारित प्रतिसाद देत आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक क्षेत्राची अडचण समजून घेऊन प्रतिसाद देत असल्याचे निर्मला सितारामन यांनी सांगितले होते.