रामराजे शिंदे, नवी दिल्ली : आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एका दिवसाचं उपोषण छेडलं आहे. ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन केल्यानंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत उपोषणाचं अस्त्र उगारलं. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. मोदी राज धर्माचं पालन करत नसल्याचा आरोप चंद्राबाबू यांनी केला. यासंदर्भात राष्ट्रपतींना निवेदन दिले जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे माजिद मेनन यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. तर राहुल गांधी यांनीही नायडूंची भेट घेऊन पाठिंबा दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंटूर इथे जाऊन चंद्राबाबू यांच्यावर हल्ला चढवला. त्याचा वचपा काढण्यासाठी चंद्राबाबू यांनी मोदींच्या पत्नींचा उल्लेख केला. 


विभाजनानंतर आंध्रप्रदेशवर केंद्र सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रार करत एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तेलुगु देसम पार्टीनं घेतला होता. एनडीएच्या माळेतून आणखी एक मणी निसटला. त्यानंतर मात्र चंद्राबाबू नायडू यांनी मोदी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. भाजपला रोखणे हाच एकमेव प्रादेशिक राज्यांतील नेत्यांचा उद्देश दिसून येतो आहे.


केवळ मोदींना विरोध नव्हे तर राज्य वाचविणे हे आव्हान प्रादेशिक नेत्यांसमोर आहे. म्हणूनच ममता यांच्या नंतर आता चंद्राबाबूंनी उपोषणाचं शस्त्र हाती घेतलं आहे. हे शस्त्र किती परिणामकारकपणे काम करतं हे आगामी काळातच कळेल.