Cyclone Fani : `फॅनी`च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या `या` गाड्या रद्द
जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम
ओडिशा : आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य भागात घोंगावणारं Cyclone Fani हे चक्रिवादळ झपाट्याने ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत असून शुक्रवारी ते ओडिशातील पुरीच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला हे वादळ पुरीपासून अवघ्या ५०० किमीच्या अंतरावर आहे.
Cyclone Faniमुळे सदर परिसरात ताशी २०० किमी वेगाने वारे वाहणार असून, जोरदार पर्जन्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारच्या दिवसासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या भागांमध्ये गजपती, गंजम, पुरी, खोर्धा, कोरापूत, रायगड, कंधमाल या जिल्ह्यांचा समावेश आहे. चक्रिवादळामुळे येणारं संकट पाहता पूर्वनियोजित राहण्यासाठी या परिसरात 'ऑरेंज अलर्ट'ही लागू करण्यात आला आहे.
भारतीय नौदल आणि तटरक्षक दल, NDRF 'फॅनी'चा सामना करण्यासाठी सतर्क असून, विविध ठिकाणी या दलांकडून बचाव कार्याच्या अनुषंगाने महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. शिवाय प्रभावित क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची संकटाची परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी जहाज आणि हॅलिकॉप्टरही तैनात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या वादळामुळे देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा लक्षात घेत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या काही मार्गांवरील प्रवासावर याचे थेट परिणाम होताना दिसणार आहेत.
मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
'फॅनी'च्या संकटामुळे मासेमारांना २ मे ते ४ मे या काळात समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रिवादळाचा एकंदर धोका पाहता केंद्राकडून आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी १,०८६ कोटींचा आपातकालीन निधी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.