नवी दिल्ली : एकीककडे आपण मेक इन इंडिया, डिजीटल इंडियाची स्वप्न पाहत आहोत पण दुसऱ्या बाजूस देशातील ३७ टक्के शाळा आजही अंधारातच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील तब्बल ३७ टक्के शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून राज्यसभेत देण्यात आली आहे. भारताचे भविष्य घडविणारी पिढी आज अंधारात शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘मार्च २०१७ पर्यंत देशातील ६२.८१ टक्के शाळांपर्यंत वीज पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.


शिक्षण नियोजन आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय विद्यापीठाकडून दरवर्षी शिक्षण क्षेत्राशी संबंधित आकडेवारी गोळा केली जाते. यामध्ये शाळांमधील सोयी सुविधांच्या माहितीचा समावेश असतो. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून ही माहिती गोळा केली जाते. ‘प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी केंद्राकडून राज्यांना मदत केली जात आहे. सर्व शिक्षण अभियान आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांच्यासारख्या योजनांच्या माध्यमातून केंद्राकडून राज्यांना निधी जात असल्याचे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी राज्यसभेत सांगितले.


झारखंडची दयनीय अवस्था


वीज पोहोचण्याच्याबाबतीत झारखंडची अवस्था दयनीय असल्याचे दिसून आले आहे. झारखंडमधील केवळ १९ टक्के शाळांपर्यंत वीज पोहोचली आहे. त्यामुळे झारखंडमधील शाळांमध्ये तातडीने वीजपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या आकडेवारीमुळे झारखंडसोबतच देशातील अनेक शाळांची स्थिती गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे.


या राज्यात पोहोचली १०० टक्के वीज


याबाबतीत दिल्ली, चंदिगड, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव, लक्षद्विप आणि पाँडेचरी येथील शाळांची स्थिती अत्यंत चांगली आहे. या भागांमधील १०० टक्के शाळांपर्यंत वीज पोहोचली आहे.


इतक्या शाळांमध्ये पोहोचली वीज


‘आतापर्यंत सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून १,८७,२४८ प्राथमिक शाळांमध्ये आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाच्या माध्यमातून १२,९३० शाळांमध्ये वीज पोहोचली आहे,’ अशीही आकडेवारी त्यांनी दिली.