OYO Hotel Crime News: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बिलासपुरमध्ये एका ओयो हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांना हॉटेल कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणांनी केलेल्या दाव्यानुसार पैसे रिफंड (Refund) मागितले म्हणून त्यांना एका रुममध्ये कोंडून मारहाण केली. संदीप कुमार आणि विकास नावाच्या व्यक्तींनी पोलिसांकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली आहे. या दोघांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली-जयपूर हायवेवरील 'हॅपी स्टे ओयो हॉटेल'मध्ये घडल्याचं या तरुणांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.


लाईट गेली पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघांनी चेक इन केलं आणि रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी हॉटेलचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर या दोघांनी जवळजवळ दीड तास लाईट परत येईल अशा अपेक्षेने वाट पाहिली. मात्र लाईट परत न आल्याने रात्री एक वाजता संदीपने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला. कर्मचाऱ्यांने पहाटेपर्यंत लाईट येणार नाही असं संदीपला सांगितलं.


बंदुकीचा धाक दाखवला अन्...


संदीपने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, "त्यामुळे आम्ही पैसे परत करावेत अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडे केली. त्यावरुन आमच्यात वाद झाला. नंतर ओयोच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण करुन एका रुममध्ये कोंडून घेतलं. त्यानंतर तीन कर्मचाऱ्यांनी (सोनू, मोजून आणि राहुलने) आम्हाला बंदुकीचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेलं आणि पुन्हा बेदम मारहाण केली. तसेच याबद्दल कोणालाही काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी आम्हाला दिली. त्यानंतर आम्हाला तिथेच तोडून ते तिघे पळून गेले," असं म्हटलं आहे.


पोलीस काय म्हणाले?


बिलासपुर पोलीस स्थानकाचे प्रमुख राहुल देव यांनी, "आरोपींची ओळख पटली आहे. मात्र ते तिघेही फरार आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल," असं सांगितलं. या प्रकरणाचा सविस्तर तपास सध्या पोलीस करत आहेत.