नवी दिल्ली: कोरोनाची साथ ही दैवी आपत्ती Act of God असून त्यामुळे यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावेल, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली होती. यामध्ये आता माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करून निर्मला सीतारामन यांना टोला लगावला. पी. चिदंबरम यांनी म्हटले की, कोरोनाची साथ ही दैवी आपत्ती असेल तर मग गेल्या तीन वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेतील गैरव्यवस्थापनाचे विश्लेषण आपण कसे करायचे? कोरोनाची साथ येण्यापूर्वी ही परिस्थिती होती. तेव्हा देवाच्या दूत  Messenger of God म्हणून अर्थमंत्री याचे उत्तर देतील का, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थव्यवस्था रोडावल्याने यंदा केंद्र सरकार राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास असमर्थ असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. या मोबदल्यात त्यांनी राज्यांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. 


 



केंद्राच्या या निर्णयावरही पी. चिदंबरम यांनी सडकून टीका केली. केंद्र सरकार आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांपासून हात झटकत आहे. हा एक मोठा विश्वासघात आणि नियमांचे थेट उल्लंघन आहे. केंद्राने राज्यांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्यास सांगितले आहे. हे केवळ वेगळ्या नावाने दिले जाणारे कर्ज आहे. अंतिमत: याचा सर्व आर्थिक बोजा हा राज्यांवर पडणार असल्याचे पी.चिदंबरम यांनी सांगितले.