Anurag Thakur :पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याबाबत पाकिस्ताने परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी केलेल्या टीकेमुळे सध्या देशातील वातावरण तापलं आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेत बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी जोरदार टिका केली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना भुट्टो यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर भुट्टो यांच्या या विधानावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे


याप्रकरणी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी याप्रकरणी आंदोलने सुरू केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी बिलावल भुट्टो यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य हे अत्यंत लाजिरवाणे होते. 1971 मध्ये याच दिवशी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. कदाचित त्यांना अजूनही वेदना होत असतील, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे.


काय म्हणाले अनुराग ठाकूर?


"पाकिस्तानची कृत्ये जगाने पाहिली आहेत. दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान मोदीं यांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई केली. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात ठार केले आणि भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. 1971 मध्ये याच दिवशी भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचा पराभव केला होता. कदाचित त्यांना अजूनही वेदना होत असतील," असे अनुराग ठाकूर म्हणाले.



लादेलना आसरा देणाऱ्यांनी शिकवू नये


याआधी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भुट्टो यांच्यावर जोरदार टीका केली. "ज्या देशाने ओसामा बिन लादेनला आसरा दिला आणि शेजारच्या देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला केला त्या देशाची या परिषदेत येऊन प्रचार करण्याची विश्वासार्हता नाही," अशी खोचक टीका परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केली.