इस्लामाबाद : २७ फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेसोबत झालेल्या हवाई संघर्षादरम्यान आपण एफ-१६ या लढाऊ विमानाचा वापर केला, अशी कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदाच दिलीय. स्वसंरक्षणासाठी आपल्याला 'काहीही' वापरण्याचा अधिकार असल्याचंही पाकिस्तानचं म्हणणं आहे. २७ फेब्रुवारी रोजी हवाई संघर्षादरम्यान भारताद्वारे पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारताकडून करण्यात आला होता. पाकिस्तानी फौजेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी जाहीर केलेल्या वक्तव्यात याचाच उल्लेख आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसिफ गफूर यांच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषेच्या पलिकडे पाकिस्तानी वायुसेनेनं (पीएएफ) केलेला हल्ला हा जेएफ-१७ द्वारे पाकिस्तान हवाई क्षेत्राच्या हद्दीत राहून करण्यात आला होता. जेव्हा दोन भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली तेव्ही पीएएफनं त्यांना पाडलं. हे सांगताना त्यांनी म्हटलं 'दोन भारतीय विमानांना पाडण्यासाठी एफ-१६ किंवा जेएफ-१७ चा वापर करण्यात आला असू शकतो, परंतु त्यामुळे काहीही फरक पडत नाही'


यावेळी, एफ-१६ चा वापर करण्यात आला असू शकतो कारण त्यावेळी एफ-१६ सहीत पीएएफचा संपूर्ण ताफा आकाशात होता आणि शेवटी तथ्य हेच राहील की पाकिस्तानी वायुसेनेनं आत्मसंरक्षणासाठी दोन भारतीय विमानांना पाडलं. भारताला हवं ते समजू शकतात, हवं तर एफ-१६ नंच समजा... पण, पाकिस्तानला आपल्या स्वसंरक्षणासाठी काहीही वापरण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी म्हटलंय. 


यावेळी, त्यांनी भारताकडून पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडल्याचा दावा फेटाळून लावला. '२७ फेब्रुवारीचा घटनाक्रम हा आता इतिहासाचा भाग झालाय. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचं कोणतंही एफ-१६ विमान पाडलेलं नाही' असं त्यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यात गफूर यांनी भारताविरुद्ध केवळ जेएफ-१७ चा वापर करण्यात आल्याचं म्हटलं होतं.