Pakistan Economy Crisis : पाकिस्तानमध्ये महागाईनं अक्षरश: कहर केलाय. इथं पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. त्यात आता पेट्रोल पंपांसह ATMमध्येही खडखडाट जाणवू लागलाय. चिनी कर्जामुळे पाकिस्तानवरील संकट आता श्रीलंकेच्या वाटेनं जाताना दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरमध्ये पेट्रोल पंपांवर ना इंधन आहे, ना ATMमध्ये पैसे. पाकिस्तानमधलं हे विदारक चित्र आहे. ही सुरूवात आहे पाकिस्तानवरील नव्या आर्थिक संकटाची. जे श्रीलंकेत घडलं त्याच वाटेनं पाकिस्तानही जाताना दिसतोय. यामागे कारण आहे चिनी कर्ज. पाकिस्ताननं चीनकडून अब्जावधी डॉलर्सचं कर्ज घेतलंय. याच कर्जाच्या ओझ्यापायी पाकिस्तान पुरता कंगाल झालाय. 


पाकिस्तानमध्ये एक लिटर दुधाची किंमत 144 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे.  तर ब्रेडचं एक पॅकेट 94 रुपयांना मिळतंय. एक किलो तांदूळ घेण्यासाठी लोकांना 180 ते 200 रुपये मोजावे लागतात. एक अंडं 16 रुपये तर एक किलो पनीर 904 रुपयांना मिळत आहे. 


पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर 
पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असून एक लिटर पेट्रोलसाठी 180 रूपये तर डिझेलसाठी 174 रूपये मोजावे लागतायेत. 1 जूनपासून इथं वीजेच्या दरात प्रति युनिटमागे 5 रूपयांची वाढ केली जाणार आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत केवळ 10 अब्ज डॉलर परकीय गंगाजळी आहे. 


त्यामुळे केवळ 2 महिने पुरेल इतकीच अन्नधान्याची आणि इतर वस्तुंची आयात केली जाऊ शकते. देशावर जवळपास 18 लाख कोटी पाकिस्तानी रूपयांचं कर्ज आहे. यातलं बहुतांश कर्ज चीनचं आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रूपयात मोठी घसरण झाली असून एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रूपयांची किंमत 202 रूपये इतकी आहे. 


पाकिस्तान सहित अनेक देश चीनच्या जाळ्यात अडकलेत. आधी मदतीचा आव आणायचा, मग कर्ज द्यायचं, मैत्रीसंबंध निर्माण करायचे आणि नंतर त्या देशावर नियंत्रण मिळवायचं हीच चीनची रणनिती. मात्र या चिनी काव्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानची अवस्था काय झालीय हे साऱ्या जगासमोर आलंय. शेजारील देशांमधील ही आर्थिक अराजकता भारतासाठीही धोक्याची घंटा ठरू शकते.