कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून मनमोहन सिंगांना निमंत्रण
कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.
नवी दिल्ली: कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मनमोहन सिंग हे शीख समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे आम्ही मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मोहम्मद कुरेशी यांनी दिली.
मात्र, मनमोहन सिंग यांच्याकडून हे निमंत्रण फेटाळले जाण्याची शक्यता आहे. ९ नोव्हेंबरपासून पाकिस्तानच्या प्रदेशातील कर्तारपूर साहिब कॉरिडोअरच्या भागाचे उद्घाटन होईल. यानंतर साधारण ११ नोव्हेंबरपासून हा मार्ग पर्यटकांसाठी खुला होईल.
या मार्गिकेमुळे कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि गुरूदासपूर येथील डेरा बाबा नानक जोडले जाणार आहेत. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५२२ मध्ये कर्तारपूर साहिब दर्ग्याची स्थापना केली होती. कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.
कर्तारपूर पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यामध्ये आहेत. डेरा बाबा नानकपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत मार्गिका बांधणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नोव्हेंबर २०१९ पर्यंत गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त ही मार्गिका खुली करण्याचे आश्वासन दिले होते.
भारताने कर्तारपूर मार्गिकेच्या निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर पाकिस्ताननेही यासाठी १०० कोटींची तरतूद केली होती.