श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी तणावाची दिसत असून, पुन्हा एकदा या परिसरात दहशतवादी आणि लष्करांमध्ये चकमक पाहायला मिळाली. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. अनेकदा बजावूनही सुरू असणाऱ्या या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दिवसेंदिवत बिघडतच आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नियंत्रण रेषा ओलांडून दोन्ही देशांना जोडणारी बस सेवा सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागातून पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे जाणारी ही बससेवा एकंदर तणावाची परिस्थिती पाहता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. 


गुरुवारी पुलवामातील आत्मघाती हल्लानंतर पाकिस्तानला भारतासोबतच इतर राष्ट्रांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्याकडून दहशतवादी संघटनांना दिला जाणारा आसरा, पाठिंबा आणि आर्थिक सहाय्य या सर्व गोष्टी तातडीने थांबवण्यात याव्यात असंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं होतं. इतकच नव्हे तर, पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष राष्ट्राचा दर्जाही पाकिस्तानकडून काढून घेण्यात आला. सर्वच स्तरांतून होणारा हा विरोध पाहता भारतातील हल्ल्यामध्ये आपल्या राष्ट्राचा हात नसल्याचं म्हणत पाकिस्तानने या साऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला खरा. पण, आता यापुढे दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी भारताकडून उचलली जाणारी पावलं पाहता शेजारी राष्ट्राकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असल्याचं स्पष्ट होत आहे.