इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱे संबंध आणखी बिघडले आणि युद्धजन्य परिस्थिती उदभवण्याची चिन्हं दिसू लागली. पुलवामा हल्ल्याचं जशा तसं उत्तर देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर पाकिस्ताननेही आपली भूमिका स्पष्ट केली. सोमवारी पाकिस्तान सैन्यदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडून होणाऱ्या हल्ल्याचं चोख उत्तर देण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे सज्ज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या प्रकरणात वायुदल प्रमुख मार्शल मुजाहिद अन्वर खान आणि इतर दोन अधिकाऱ्यांची भेट घेतली, जे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सैन्यदलातील दोन्ही मुख्य अधिकारी हे पाकिस्तान सैन्याची तयारी, त्यांच्यातील ताळमेळ आणि समन्वय पाहून प्रभावित असून, भारतीय सैन्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपण सज्ज असल्याचं स्पष्ट केलं. 


१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. भारतात वारंवार होणारे दहशतवादी हल्ले, जम्मू- काश्मीर परिसरात होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि वारंवार भारत- पाकिस्तान शस्त्रसंधीचं होणारं उल्लंघन ही एकंदर परिस्थिती पाहता या दोन्ही देशांचे संबंध आणखी चिघळले आहेत. शिवाय पाकिस्तानला इतरही राष्ट्रांकडून दहशतवादी कारवायांचं समर्थन न करण्याची ताकिद देण्यात आली आहे. त्यामुळे या साऱ्याला गंभीर वळण मिळत आहे. दरम्यान, शेजारी राष्ट्राचा पवित्रा पाहता भारताकडून यावर काय भूमिका घेतली जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तूर्तास पाकिस्तान मात्र होणारा हल्ला परतवून लावण्याच्याच तयारीत असल्याचं उघड झालं आहे.