पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; लष्कराचे नायब सुभेदार शहीद
पोस्टचं रक्षण करताना आलं हौतात्म्य
श्रीनगर : सोमवारी पहाटेच्या सुमारास pakistan पाकिस्तानकडून नौशेरा आणि कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यामध्ये एका भारतीय जवानाला आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात सैन्यातील नायब सुभेदार शहीद झाल्याचं कळत आहे.
नियंत्रण रेषेपाशी पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच पाकिस्तानकडून उखळी तोफांचा जबर मारा करण्यात आला. याशिवाय सातत्यानं कुरापती करणाऱ्या शेजारी राष्ट्राकडून यावेळी गोळीबारही करण्यात आला. ज्याचं भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं. पण, यामध्ये एका जवानाला प्राणांना मुकावं लागलं.
फॉरवर्ड पोस्टवर असतेवेळी आपलं कर्तव्य बजावणारे हे नायब सुभेदार या हल्ल्यात जबर जखमी झाले. ज्यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण, तोवर त्यांची प्राणज्योत मालवली होती. या महिन्यात पूंछ, राजौरी भागात पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या गोळीबीरात शहीद होणारे हे चौथे भारतीय जवान ठरले आहेत. यापूर्वीही सीमेपलीकडून केल्या गेलेल्या या भ्याड हल्ल्यांमध्ये जवान शहीद झाले होते.