आईशप्पथ! पाकिस्तानातील गुगल सर्चमध्ये भारतीय वायूदल टॉप ट्रेंडमध्ये
या पाच कीवर्डसने सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले.
नवी दिल्ली: भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर गुगल या सर्च इंजिनवर एक रंजक निरीक्षण समोर आले. त्यानुसार मंगळवारी दिवसभरात पाकिस्तानी जनतेने गुगलवर पाकिस्तानी वायूदलापेक्षा भारतीय वायूदलाच्या नावाने अधिकवेळा सर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय वायूदलाने मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला होता. यावेळी भारतीय विमानांनी या परिसरात जवळपास १००० किलो स्फोटके डागली. भारतीय वायूदल ही मोहीम यशस्वीपणे फत्ते करून माघारी आल्यानंतर याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांवर येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून पाकिस्तानी नागरिकांनी 'Pakistan Air Force' पेक्षा 'Indian Air Force' या नावानेच अधिकवेळा सर्च केले. पाकिस्तानमधील बहुतांश भागांमध्ये हा ट्रेंड दिसून आला.
याशिवाय, भारत आणि पाकिस्तानात Indian Air force, Pakistan Air Force, Balakot, surgical strike and LoC या पाच कीवर्डसने सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे गुगलच्या पॅटर्न ग्राफमध्ये दिसत आहे. भारतात surgical strike आणि पाकिस्तानमध्ये Balakot हे टॉप ट्रेडिंग कीवर्ड ठरल्याचेही गुगल ग्राफमध्ये दिसून आले.
दरम्यान, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आजचा हल्ला हा केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करणारा असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला इजा पोहोचवण्याचा हेतू नव्हता, असे भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्पष्ट केले. मात्र, पाकिस्तानकडून या हल्ल्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या या हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही पाकने दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमारेषेवरील बंदोबस्तात आणखी वाढ केली आहे.