मुंबई : काही ठराविक परिस्थितीत गर्भपाताची मर्यादा वाढवण्यासंदर्भातलं विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. गर्भपात करण्याची मर्यादा ठराविक केसेसमध्ये २० ते २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्याबाबत हे विधेयक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Medical Termination of Pregnancy (Amendment) Bill 2020 या अंतर्गत हे बदल करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं होतं. त्यानंतर आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं. चर्चेअंती आवाजी मतदानाने हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं.


डॉ.हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं की, गर्भपातासंदर्भातील जगभरातल्या कायद्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.


हे विधेयक नेमकं आहे काय?


सध्याच्या घडीला 12व्या आठवड्यापर्यंतच महिलेला गर्भपात करण्याची अनुमती आहे. मात्र त्यासाठी डॉक्टरांनीही त्याला मान्यता देण्याची गरज असते. आणि जर १२ ते २० आठवड्यादरम्यान गर्भपात करायचा असेल, तर २ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. पण आता गर्भपाताची मर्यादा काही असाधारण किंवा अपवादात्मक केसेसमध्ये २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या विधेयकाचा कुठल्याही स्थितीत दुरूपयोग होता कामा नये, असाही उल्लेख करण्यात आला आहे.


राज्यसभेत या विधेयकावर चर्चा करताना शिवसेना, समाजवादी पार्टी सीपीएमच्या काही खासदारांनी आक्षेप घेतला. या विधेयकावर विचार करण्यासाठी समिती नेमण्यात यावी, अशी त्यांची भूमिका होती.