Parliament Session: संसदेच्या विशेष अधिवेशनाची (Parliament Special Session) सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाषणाने झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या इमारतीतील आजचा शेवटचा दिवस असल्याचे म्हटलं आहे.  उद्यापासून आम्ही संसदेच्या (Parliament) नवीन इमारतीत स्थलांतरित होऊ आणि नवीन सुरुवात होईल. पण ही वास्तू आपल्यासाठी एक वारसा आहे आणि अनेक प्रेरणादायी क्षण तिच्याशी जोडले गेले आहेत असे म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेच्या इमारतीत देशवासियांचा पैसा


"नवीन सभागृहात जाण्यापूर्वी त्या प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांचे स्मरण करून पुढे जाण्याची ही संधी आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे सभागृह इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असायचे. स्वातंत्र्यानंतर त्याला संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही संसद भवन जरी इंग्रजांनी बांधली असली तरी या इमारतीच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम गाळला, मेहनत माझ्या देशवासियांची होती आणि पैसाही आमच्याकडूनच दिला होता असे आपण अभिमानाने सांगू शकतो. 75 वर्षांच्या या प्रवासात अनेक उत्तमोत्तम प्रक्रिया निर्माण झाल्या आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


चांद्रयान-3 च्या यशाने आज संपूर्ण देश भारावून गेला आहे. यामध्ये आधुनिकता, विज्ञान, तंत्रज्ञान, आपले शास्त्रज्ञ आणि 140 कोटी देशवासीयांच्या दृढनिश्चयाच्या शक्तीशी भारताच्या सामर्थ्याचे एक नवीन रूप जोडले गेले आहे. देश जगावर नवी छाप सोडणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.


देश माझा इतका सन्मान करेल, याची कल्पना नव्हती - पंतप्रधान मोदी


"खासदार म्हणून मी पहिल्यांदा या इमारतीत आलो तेव्हा या संसद भवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवून आत आलो. लोकशाहीच्या या मंदिरात मी श्रद्धेने प्रवेश केला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब संसदेत पोहोचला हे भारताच्या लोकशाहीचे बलस्थान आहे. देश माझा इतका सन्मान करेल, याची कल्पनाही केली नव्हती. कोरोनाच्या काळातही आपले खासदार या सभागृहात आले होते. आम्ही देशाचे काम आम्ही थांबू दिले नाही. राष्ट्राचे कार्य थांबू नये, हे प्रत्येक सदस्याने आपले कर्तव्य म्हणून स्वीकारले. सदस्यांनी संसद चालू ठेवली," असेही पंतप्रधान म्हणाले.


"संसदेवरील हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश ही घटना विसरू शकत नाही. या सभागृहातील लोकांना वाचवण्यासाठी ज्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनाही मी सलाम करतो. हा संसदेवरचा हल्ला नसून देशाच्या आत्म्यावरील हल्ला होता. पत्रकारांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, संसदेचे कामकाज लोकांपर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचेही योगदान आहे. संसद कव्हर करणाऱ्या पत्रकारांची नावे माहीत नसतील पण त्यांचे कार्य विसरता येणार नाही," असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.