Omicron मुळे या राज्यात आंशिक लॉकडाऊन, उद्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता या राज्यात आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नियमांचं कठोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोलकाता : ओमायक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेला इशारा लक्षात घेऊन आणि बंगालमधील कोरोनाची वाढलेली प्रकरणे लक्षात घेऊन बंगाल सरकारने रविवारी कोविड-19 संबंधित निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) कोरोना साथीच्या वाढत्या संसर्गानंतरच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM mamta Banerjee) यांनी सोमवारी नेताजी इनडोअर स्टेडियमवर होणारा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनी सांगितले की, बंगालमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उद्यापासून बंद राहतील. खासगी आणि सरकारी कार्यालयातील उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस फक्त सोमवार आणि शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीहून उड्डाणे चालतील.
मुख्य सचिव एचके द्विवेदी म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच काही निर्बंध लादले जातील असे सांगितले होते. सोमवारपासून ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाईल आणि इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी RAT चाचणी अनिवार्य केली जाईल.
सोमवारपासून सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद राहणार आहेत. सरकारी आणि खाजगी सर्व कार्यालयात फक्त 50 टक्केच उपस्थित राहणार आहे. सर्व जलतरण, स्पा आणि ब्युटी पार्लर बंद राहतील. पर्यटन स्थळे, प्राणीसंग्रहालय, सिनेमागृहे बंद राहतील आणि शॉपिंग मॉल्समध्ये 50 टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे. सभा, सभागृह आणि परिषदांमध्ये 50 टक्के उपस्थिती असेल. लोकल ट्रेन 50 टक्के क्षमतेने धावणार असून ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत धावणार आहे. मेट्रोही 50 टक्के क्षमतेने धावणार आहे. होम डिलिव्हरी करताना प्रोटोकॉल पाळावा लागेल. रात्री 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल.
कोलकातामध्ये 11 मायक्रो कंटेनमेंट झोन
अधिसूचनेनुसार, 'नेहमी मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आणि स्वच्छता राखणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे' मात्र, सरकारने निम्म्या कर्मचाऱ्यांसह खासगी आणि सरकारी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे. ते म्हणाले की कोलकातामध्ये 11 सूक्ष्म-कंटेनमेंट झोन असतील. इतर जिल्ह्यांमध्येही असाच झोन तयार केला जाईल.
कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कारवाई
अधिसूचनेत म्हटले आहे की, जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय आणि स्थानिक अधिकारी मास्क घालण्याच्या आणि सामाजिक अंतर राखण्याच्या राज्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करतील.