मध्य प्रदेशच्या जंगलात सापडलेल्या `त्या` सांगाड्याबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; वर्षभरानंतर आरोपी ताब्यात
मध्य प्रदेश पोलिसांना आठ महिन्यांपूर्वी एका मानवी सांगाड्याचे 80 तुकडे सापडले होते. त्यांनतर पोलिसांनी तब्बल 8 महिने तपास करत एका आरोपीला अटक केली
मध्य प्रदेश : देभरात सध्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड (sharda walker case) प्रकरण गाजत आहे. लिव्ह इनमध्ये सोबत राहत असलेल्या आफताब पूनावालाने (aftab poonawalla) श्रद्धाची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आफताबच्या चौकशीनंतर श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकडे वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्येही एका दारुड्या तरुणाने आपल्या पित्याची अशाच प्रकारे हत्या केल्याचे समोर आले होते. यानंतर मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) फेब्रुवारीमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे समोर आले होते. आता वर्षभरानंतर या प्रकरणाचा उलघडा झालाय.
फेब्रुवारी महिन्यात मध्य प्रदेशच्या दुधमुनिया जंगलात एका तरुणाच्या सांगाड्याचे 80 तुकडे सापडले होते. 21 वर्षीय वृक्षारोपण कंत्राटदाराची हत्या करून त्याला जंगलात फेकून देणाऱ्या 31 वर्षीय आरोपीला रेवा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. युनूस अन्सारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दुसरा आरोपी युनूस अन्सारीचा मेहुणा सरताज मोहम्मद हा अद्याप फरार आहे, असे मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले.
वर्षभरानंतर हत्येचा उलघडा
8 महिन्यांपूर्वी जंगलात सापडलेल्या सांगाड्याचे गूढ उकलताना रेवा पोलिसांनी युनूस अन्सारीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, हत्या झालेली व्यक्ती त्याच्या बहिणीचा विनयभंग करत होती. याचा बदला घेण्यासाठी त्याला ठार मारून जंगलात फेकून दिले. हे प्रकरण मौगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. चुईया गावातील विकास गिरी याने 5 नोव्हेंबर 2021 रोजी घर सोडले होते. यानंतर तो घरी परतला नाही. यानंतर विकासच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना तपासादरम्यान 5 फेब्रुवारी रोजी दुधामनिया जंगलात अनेक तुकड्यांमध्ये एका व्यक्तीचा सांगाडा सापडला होता.
अशी झाली आरोपीला अटक
रेवाचे पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये दुधमुनिया जंगलात काही पशुपालकांना मृतदेहाचे तुकडे आणि आधार कार्डचे काही भाग सापडले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी जंगलात जाऊन तेथून मृतदेहाचे 80 तुकडे ताब्यात घेतले होते. 9 महिने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. गावकऱ्यांनी सांगितले की, गिरीला अन्सारीच्या बहिणीसोबत अनेकदा पाहिले होते. दोघांचे प्रेमसंबंधही असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विकास गिरी हा अन्सारीचा कामामध्ये भागीदारही होता. पोलिसांनी अन्सारीची अनेकदा चौकशी केली, मात्र त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही. पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी अन्सारीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीत अन्सारीने कबूल केले की विकास गिरी त्याच्या बहिणीला अनेकदा छेडछाड करत असे. त्यामुळे त्याने विकासची हत्या केली.
कशी केली हत्या?
पोलिसांच्या चौकशीत युनूसने सांगितले की तो अंड्यांचा व्यवसाय करतो. एकदा विकास त्याच्या घरी अंडी घेण्यासाठी आला होता तेव्हा त्याने. विनयभंग केला. घरी आल्यानंतर आपल्याला घटनेची माहिती मिळाली. यानंतर तो मेहुण्यासोबत विकासचा शोध घेऊ लागला. विकास सापडल्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात रॉडने हल्ला केला. यानंतर त्याचे हात-पाय बांधून जंगलात फेकण्यात आले, जेणेकरून तो वाचला तरी तेथून पळून जाऊ नये आणि तेथेच त्याचा मृत्यू होईल. दरम्यान, हत्येनंतर तब्बल चार महिन्यांनी पोलिसांना विकासचा मृतदेह मिळाला होता.