एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा कपडे उतरवून धिंगाणा
हा प्रवासी नग्नपणे विमानात फिरत होता.
पाटणा: एअर इंडियाच्या विमानात शनिवारी एका प्रवाशाने कपडे उतरवून गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाचे IX-१९४ हे विमान दुबईहून लखनऊला येत होते. विमान हवेत असतानाच या प्रवाशाने अंगावरील कपडे उतरवले. त्यानंतर हा प्रवाशी नग्नपणे विमानात फिरायला लागला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेच त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले. यानंतर विमान प्रवास पूर्ण होईपर्यंत या प्रवाशाला त्याच्या सीटवर बसून ठेवण्यात आले.या साऱ्या प्रकारामुळे विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित प्रवाशाने हे कृत्य का केले, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, लखनऊ विमानतळावर या प्रवाशाला सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या त्यांच्याकडून या प्रवाशाची चौकशी सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात प्रवासादरम्यान एक प्रवासी सिगारेट ओढत असल्याचा प्रकार समोर आला होता. २५ डिसेंबरला इंडिगोचे ६ई-९४७ हे विमान अहमदाबादहून गोव्याला जात होते. त्यावेळी एक प्रवासी विमानातील स्वच्छतागृहात सिगारेट ओढताना आढळून आला. यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी या प्रवाशाला सिगारेट विझवायला सांगितली. या प्रकारामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याने विमान गोवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले होते.