मुंबई - एका प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातल्यामुळे काहीवेळ विमानातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. एअर इंडियाच्या दुबईहून लखनऊला येत असलेल्या विमानात हा प्रकार घडला. विमानतळावर विमान उतरल्यावर संबंधित प्रवाशाला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी हा प्रकार घडला. 


दुबईहून लखनऊला निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानामध्ये बसलेल्या एका प्रवाशांना मध्येच उठून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने स्वतःशीच झटापट सुरू केल्यावर एअर हॉस्टेसची धावपळ झाली. त्यांनी लगेचच घडलेला प्रकार वैमानिकांना कळवला. वैमानिकांनीही याबाबत हवाई वाहतूक नियंत्रकांच्या साह्याने लखनऊ विमानतळावर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्याची मागणी केली. यावेळी विमान लखनऊच्या जवळच पोहोचले होते. विमान धावपट्टीवर उतरल्यावर लगेचच संबंधित प्रवाशाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. त्यांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केल्यावर तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आले. तो मुळचा उत्तर प्रदेशमधील राहणारा असून, कामासाठी दुबईला गेला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याने स्वतःच्या नातेवाईकांनी नावे सांगितली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क साधण्यात आला आणि मनोरुग्ण प्रवाशाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.