पठाणकोट : जम्मू काश्मीरच्या कठुआमधील बंजारा समाजाच्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. न्यायालयाने याप्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली आहे. यातील 3 दोषींना आजीवन कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांझीराम, दीपक खजुरिया, प्रवेश कुमारला आजीवन कारावास सुनावण्यात आली आहे. 3 आरोपींना 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोषींना दोन कलमानुसार 50-50 हजार आणि 1 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दीपक, सांझी आणि प्रवेश यांनाही एकएक लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. पुरावे नष्ट करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि विशेष पोलीस अधिकारी सुरेंदर वर्माला 5 वर्षांची कैद सुनावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पठाणकोटच्या स्पेशल कोर्टाने सातमधील सात दोषींपैकी 6 आरोपींना दोषी ठरवले होते. गेल्यावर्षी १० जानेवारीला पीडित मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर तिला गावातील मंदिरात बेशुद्ध करून डांबून ठेवण्यात आले होते. या काळात नराधम आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची मोठी लाट उसळली होती. देशभर निषेध मोर्चे काढण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सांजी राम याने परिसरातून मुसलमानांना हुसकावून लावण्यासाठी हे कृत्य केल्याचेही तपासात समोर आले होते. सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे. त्यानेच या अमानवी कृत्यासाठी इतरांना भडकावले होते.



पोलिसांनी दाखल केलेल्या १५ पानी आरोपपत्रात या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाल्याचे म्हटले होते. मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली होती.