मुंबई : जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुखपदी असणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या त्यांच्या घरातून गेस्ट हाऊसमध्ये गेल्यांतर पीडीपीच्या खासदारांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. राज्यसभेत पीडीपीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा अशी महत्त्वाची बाब या संदेशात नमूद करण्यात आली आहे. पीडीपीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा नाहीतर त्यांना निलंबित करण्यात येईल, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि  ओमर अब्दुल्ला यांना अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याच्या काही तासांनी लगेचच अटक करण्यात आली होती. तेव्हा आता मुफ्ती यांनी दिलेल्या संदेशरुपी आदेशाची अंमलबजावणी केली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


भाजपाच्या साथीने असणाऱ्या पीडीपीकडून जून २०१८ मध्ये पाठिंबा काढून घेतला होता. पीडीपीचे दोन खासदार राज्यसभेत निवडून गेलेले आहेत. मिर फय्याज आणि Nazir Ahmed Laway हे पीडीपीचे चेहरे राज्यसभेत पाहायला मिळतात. 
दरम्यान, ज्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याविषयीचं विधेयक मांडलं, तेव्हा मिर फय्याज आणि नझीर अहमद यांनी कुर्ता फाडत या प्रकरणाचा निषेध केला होता. दरम्यान, खुद्द फय्याज यांनीही आपल्याला राजीनामा देण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. 


केंद्राकडून ज्यावेळी अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय सुनावण्यात आला तेव्हा, मेहबुबा मुफ्ती यांनी काही ट्विट करत या निर्णयाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला होता. भारतीय लोकशाहीतील काला दिवस असा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काश्मीरच्या खोऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा सरकारने विश्वासघात केला आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. तर, हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली होती.