कपडे काढताच तरुणांचं पितळ पडलं उघड, वेष बदलून मागत होते पैसे, लोकांनी खऱ्या तृतीयपंथीयांकडे सोपवलं अन् नंतर...
गावात दोन तरुण तृतीयपंथीयांप्रमाणे वेशभूषा करुन फिरत होते. इतकंच नाही तर लोकांकडे पैसे मागत होते. कमी पैसे देणाऱ्यांशी वादही घातले जात होते. पण लोकांना संशय आला आणि भांडाफोड झाला.
मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी गावात तृतीयपंथी बनून फिरणाऱ्या दोन तरुणांना रंगेहाथ पकडलं आहे. तृतीयपंथी बनून फिरणाऱ्या दोन्ही तरुणांना पाहिल्यानंतर गावकऱ्यांना संशय आला होता. यानंतर त्यांनी त्यांना पकडून चौकशी केली. त्यांचे कपडे काढण्यात आले असता त्यांनी आतमध्ये शर्ट आणि पँट घातली होती. यानंतर ग्रामीणांना हे खरे तृतीयपंथी नसल्याचं लक्षात आलं. या दोन्ही तरुणांकडे मिर्ची स्प्रेसह, इतर सामानही सापडलं आहे. गावकऱ्यांनी नंतर खऱ्या तृतीयपंथींना याची माहिती दिली आणि त्यांना त्यांच्याकडे सोपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ननावद गावात मागील काही दिवसांपासून 2 तरुण तृतीयपंथीयांप्रमाणे वेशभूषा करत फिरत होते. ते गावात फिरुन लोकांकडे पैसे मागत होते. यादरम्यान काही लोकांकडे ते जास्त पैशांची मागणी करत होते. ज्यामुळे वाद, भांडणंही होत होती.
यादरम्यान काही गावकऱ्यांना त्यांच्यावर संशय आली. गावातील काही पुरुष आणि महिलांनी त्यांची चौकशी सुरु केली. यावर तृतीयपंथीयांच्या वेषात आलेले हे तरुण त्यांना धमकावू लागले. यामुळे संतापलेल्या काही ग्रामस्थांनी त्यांची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांची तपासणी केली असता हे तृतीयपंथी नसून तरुण असल्याचं उघड झालं.
यानंतर ग्रामस्थांनी या तरुणांना खऱ्या तृतीयपंथीयांकडे सोपवलं. विशेष म्हणजे पोलिसांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांकडे याप्रकरणी कोणतीही तक्रार, गुन्हा दाखल झालेला नाही.