भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये दरवर्षी चांगला पाऊस पडावा यासाठी बेडकांचे अनोखे लग्न लावले जाते. हे लग्न लावल्यानंतर पाऊस चांगला पडतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हिंदू रितीनुसार, धामधूमीत हा लग्नसोहळा पार पाडला जातो. दरम्यान, यावर्षी राज्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि याचा त्रास अनेक गावांसह नागरिकांना झाला. त्यामुळे पाऊस नको म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली. याआधी पाऊस हवा म्हणून बेडकांचे लग्न लावणाऱ्या लोकांनी आता, पाऊस नको म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट घडवून आणला. त्यासाठी विधीही पार पाडले. सध्या याच घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात बेडकांचे लावण्यात आलेले लग्न खूप पाऊस झाल्यामुळे आता मोडण्यात आले आहे. मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी बेडकांचा चक्क घटस्फोट घडवून आणला. लोकांनी पावसाच्या तडाख्यापासून बचावण्यासाठी, अंधश्रद्धा आणि पूजा-पाठचा आधार घेतला आहे.



मध्यप्रदेशमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे लोक हैराण झाले आहेत. अनेक नद्यांच्या पूर आला आहे. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पावसापासून वाचण्यासाठी लोक पूजा-पठणाचा आधार घेत आहेत. 


भोपाळच्या इंद्रपुरीमध्ये आधी लोकांनी चांगल्या पावसासाठी मातीच्या बेडकांचे लग्न लावले होते. पण आता मुसळधार पावसाने त्रस्त होत, संपूर्ण विधिवतपणे बेडकांचा घटस्फोट घडवून आणला आहे.


मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ आणि इतर शहरांत पावसाचा जोर आहे. भोपाळमध्ये या हंगामातील पावसाने गेल्या १२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. या दरम्यान, प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.