जिल्हा बँकांना ५००, १००० च्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करण्याची परवानगी
जिल्हा आणि सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई : जिल्हा आणि सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. येत्या तीस दिवसात बँकांना त्य़ांच्याकडच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहेत.
गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी पहिल्या दिवशी जिल्हा बँकांना जुन्या नोटा घेण्यास मनाई होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकांना नोटा बदली करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर तीन दिवस बँकांमध्ये नोटा घेण्यात आल्या. बदलून देण्यात आल्या. पण तीन दिवसांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकांमध्ये भरण्यास मनाई केली. त्याचप्रमाणे ज्या खात्यात त्या रकमा जमा झाल्या, त्या सर्व खातेधाराकांनी केवायसीचे निकष पूर्ण केल्याशिवाय जुन्या नोटा घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे जिल्हा बँकांमध्ये मोठ्याप्रमाणात रोकड पडून आहे.
राज्यात एकूण 32 जिल्हा बँका आहेत. त्यांच्याकडे 5228 कोटींच्या नोटा जमा आहेत. त्यापैकी सर्वाधिक रक्कम पुणे जिल्हा बँकेकडे असून ही रक्कम आठशे अकरा कोटींच्या घरात आहे. तर त्यापाठोपाठ नाशिक जिल्हा बँकेत 376 कोटी, चंद्रपूर जिल्हा बँकेत 356 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा आहेत.