कर्नाटकातल्या जेलमधून नागपुरात फोन आणि 100 कोटींची खंडणी... नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्याचा शोध लागला
Nitin Gadkari Death Threats : शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तीनवेळा धमकीचे फोन आले होते. यासह फोन करणाऱ्याने 100 कोटींची खंडणीही मागितली होती.
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे (Death Threats) एकच खळबळ उडाली आहे. नागपूरमधील नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी धमकीचे तीन फोन आले होते. नागपुरात (Nagpur) मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पोलिसांनी नितीन गडकरी यांचे कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षा तात्काळ वाढवली. यानंतर पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा तपास सुरु केला. गडकरी यांना धमकी देणाऱ्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने दाऊद इब्राहीमचा (Dawood Ibrahim)उल्लेख करत आम्हाला खंडणी (Extortion) दिली नाही तर गडकरींना जीवे मारु असे म्हटले होते. सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे कॉल आले. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धाव घेतली. नितीन गडकरी हे नागपुरातच असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी नितीन गडकरी यांना फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी बीएसएनएलकडून कॉल रेकॉर्डही मागवण्यात आले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला. गडकरींना फोन करणारा कुख्यात गुंड जयेश कांथा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जयेश कांथा कर्नाटकातील बेळगावच्या कारागृहात आहे. या घटनेनेनंतर कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याने तुरुंगातूनच गडकरींना धमकीचे फोन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कुख्यात जयेश कांथा याने तुरुंगातून फोन केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलीस बेळगावला रवाना झाले आहेत. फोन करणाऱ्याने फोन ऑपरेटरला आपण डी गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आणि गडकरींकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास गडकरींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली." दुसरीकडे हे प्रकरण समोर येताच येताच बेळगाव कारागृह प्रशासनही कामाला लागले आहे. छाप्यादरम्यान पोलिसांना कांथा याच्याकडून एक डायरी सापडली, ती जप्त करण्यात आली आहे.
कोण आहे जयेश कांथा?
गँगस्टर जयेश कांथा हा हत्येच्या प्रकरणात बेळगावातील कारागृहात शिक्षा भोगत आहे. जयेश कांथाने तुरुंगातून अवैधरित्या फोनचा वापर करुन नितीन गडकरी यांच्या कार्यालयात तीन वेळा धमकीचे फोन केले होते.