पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी
Petrol Diesel Price: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किमतीत कपात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर नागरिक आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? असा प्रश्न विचारत आहेत. दररोज वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या किंमतीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला याच्या किंमतीही यामुळे वाढत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पेट्रोल पंप डीलर्सची बैठक
पेट्रोल डिझेलच्या किंमती आटोक्यात कशा आणल्या जातील? यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात हा लाभ जोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किमतीत कपात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पेट्रोल पंप डीलर्सची बैठक ९ सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
डीलर कमिशन वाढवण्याची मागणी
पेट्रोल पंप डीलर्सच्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान डीलर्सचे कमिशन वाढवण्याबाबत येथे चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची फेरफार करायची असल्यास त्याची माहिती अगोदर द्यावी, अशी मागणी करणारे पत्रही डीलर्सच्या वतीने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी
कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स (सीआयपीडी) ने यासंदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. दरातील बदलाबाबत माहिती देण्याची मागणीही सीआयपीडीने केली आहे. सरकारने तेल विपणन कंपन्यांना (OMCs) डीलरचे कमिशन वाढवण्याचे निर्देश द्यावेत, असे यामध्ये म्हटले आहे.
G-20 साठी जगभरातील दिग्गज भारतात, सर्वसामान्यांना याचा काय फायदा? जाणून घ्या
आता गणपती आणि त्यानंतर दिवाळीचा सण येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 2 महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 3 ते 5 रुपयांनी कमी होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून वर्तवली जात आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान काही राज्यांच्या निवडणुका आहेत. दरम्यान सरकारकडून पेट्रोल-डिझेल कपात करण्याचे पाऊल उचलले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जेएम एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला असल्याचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल किंमतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.