मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ कायम आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पेट्रोल 9 पैशांनी तर डिझेल 29 पैशांनी वाढलं. यामुळे आता पेट्रोल 87.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 78.22 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल 1 रुपयांनी कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये 1.50 रुपयांनी कपात केली आहे.


रुपयाच्या बदल्यात तेल


भारतातील दोन सरकारी तेल कंपन्यांनी इराणकडं नोव्हेंबरमधील तेलासाठीची मागणी नोंदवलीय. ४ नोव्हेंबरपासून इराणचे सर्व आर्थिक व्यवहाराचे मार्ग बंद होतील. त्यामुळं इराणला अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करता येणार नाही.


मात्र इराणनं भारतीय रुपयाच्या बदल्यात तेल देण्याचं कबूल केल्यामुळं भारतासाठी हा व्यवहार अधिक सोयीचा आणि स्वस्तातला ठरणार आहे.


अमेरिकेचे निर्बंध


इराणकडून भारताने इंधन खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने निर्बंध घातले होते. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी निर्बंध असूनही भारत इंधन खरेदी करेल असा विश्वास व्यक्त केला होता. दोन्ही देशातील आर्थिक सहकार्याचे धोरण यापुढेही सुरुच राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.


दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भेट घेतली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र करारातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणवर निर्बंध घालण्यात आले होते. अमेरिकेने इराणकडून तेल आयात करणास मनाई केली होती.


भारत सर्वांत मोठा देश


भारत हा इराणकडून तेल खरेदी करणारा सर्वांत मोठा देश आहे. भारताने इराणकडून तेल आयात वाढवण्याचा निर्णय देखील घेतला होता. इराणननेही भारताला आर्थिक व्यवहारात मोठी सूट देण्याची ग्वाही दिली होती.


जुन्या पंपांवर दोन आकडेच 


 बहुसंख्य पेट्रोल पंपाना अपग्रेड करण्याची गरज नाहीयं. पण जुन्या पेट्रोल पंपावर केवळ दोन आकड्यातल्याच किंमती दिसताहेत.


येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किंमतीत आणखी 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेंसर्स वाल्या पंपांना अडचण होऊ शकते. 


पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.


विमान प्रवासही महाग 


विमानाच्या इंधनाचे दरही वाढलेत. आता विमानाचं इंधन 2  हजार 650 रुपये प्रतिकिलो लिटरला विकलं जाणार आहे.


हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.