नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या महिन्यापासून सातत्याने कमी होत आहेत. येत्या काळात हे दर आणखी कमी होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. यामुळे ग्राहकांना येत्या काळात आणखी दिलासा मिळणार आहे. गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर सतत कमी होत आहेत. सद्यस्थितीत पेट्रोल-डिझेचे दर हे गेल्या वर्षभराच्या तुलनेतील सर्वात कमी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेंद प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. देशातील रिफायनरींची क्षमता वाढत असल्याने याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेल कमी किंमतीत मिळेल. तसेच इतर पेट्रोलियम उत्पादनांची किंमतदेखील कमी होईल. यामुळे महागाईला आळा बसेल.


पहिल्याच दिवशी दर कपात


वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेत. आज, २ जानेवारीला पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. काल मंगळवारी दरांमध्ये १७ पैशांनी घट झाली होती. दिल्लीत पेट्रोलचे दर १९ पैशांनी कमी झाल्याने सध्याचे दर हे ६८.६५ रुपये इतके आहे. तर डिझेलच्या दरांत २ पैशांनी घसरण झाल्याने सुधारित दर ६२.६६ रुपये इतके आहे. 


इतर शहरातील दर


मुंबईत पेट्रोलचे दर हे १७ पैशांनी कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचे दर ७४.३० रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलचे दर २ पैशांनी कमी झाल्याने ६५.५६ रुपये प्रतिलिटर इतके आहे. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे ७१.२२ आणि ६६.१४ रुपये आहेत. कोलकात्यात पेट्रोलचे दर १८ पैशांनी कमी झाल्याने सध्याचे दर ७०.७८ रुपये इतके आहे. तर डिझेलचे दर १९ पैशांनी कमी होऊन, सध्याचे दर हे ६४.४२ रुपये इतके आहेत. 


घरगुती गॅसचे दर


नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित किंमतीनुसार दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १२०.५०रुपयांनी घट झाल्याने सिलिंडर ६८९ रुपयांना मिळणार आहे. तर अनुदानित सिलिंडरच्या दरामध्ये ५.९१ रुपयांची घट करण्यात आली आहे. दिल्लीत अनुदानित सिलिंडरचे दर हे ४९४.९९ रुपये इतके आहेत.