पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत इतकी घट, पाहा आजच्या किंमती
सौदीने तेल कपातीचा निर्णय घेतल्याचे सौदीच्या उर्जा मंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेले काही दिवस कमी होताना दिसत आहेत. गुरूवारी पुन्हा या किंमती घसरल्याचे दिसले. गुरूवारी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती 15 पैशांनी कमी होऊन पेट्रोल 77.28 रुपये प्रति लीटर झाले. यासोबतच डिझेलच्या किंमतीतही 10 पैशांनी कपात होऊन ते 72.09 प्रति लीटर झाले. मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 14 पैशांनी कपात नोंदवली गेली. यानंतर मुंबईत पेट्रोलची किंमत 82.20 रुपये प्रति लीटर झाली. डिझेलच्या किंमतीत 11 पैशांनी कपात झाली. यानंतर डिझेल 75.53 रुपये प्रति लीटर झाले.
दर कपात सुरूच
4 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2.50 रुपये प्रति लीटर कपातीची घोषणा केली.
तेलावरी एक्साइज ड्युतीत सरकारने प्रति लीटर 1.50 रुपयांनी कपात केली होती आणि एक रुपये प्रति लीटर कपातीचा भार तेल कंपन्यांना उचलण्यास सांगितला होता.
किंमती पुन्हा वाढणार ?
तेलाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात असे भाकित एंजेल ब्रोकिंग हाऊसचे उर्जा विषयक विशेषज्ञ अनुज गुप्ता यांनी केलंय.
तेल उत्पादक प्रमुख देश असलेला सौदी अरब देश तेलाच्या निर्यातीत कपात करणार आहे. डिसेंबरमध्ये तेलाची निर्यातीत प्रतिदिन पाच लाख बॅरलने घट होऊ शकते असे सौदी अरबच्या उर्जा मंत्र्यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सौदीने तेल कपातीचा निर्णय घेतल्याचेही त्यांच्या उर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले.