नवी दिल्ली - साधारणपणे १० ऑक्टोबर २०१८ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली घट आता थांबण्याची शक्यता आहे. कारण गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर झाला आहे. गुरुवारी देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३८ पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर २९ पैशांनी वाढले. वाढीमुळे पेट्रोल प्रतिलिटर ६८.८८ वर जाऊन पोहोचले आहे. तर डिझेल प्रतिलिटर ६२.५३ वर जाऊन पोहोचले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा विचार केल्यास पेट्रोलच्या किमतीत ३७ पैशांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा आजचा दर ७४.५३ वर जाऊन पोहोचला आहे. तर डिझेलचा दर मुंबईमध्ये प्रतिलिटर ३१ पैशांनी वाढला आहे. मुंबईमध्ये गुरुवारी डिझेलचा दर ६५.४३ इतका आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल वाढत असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आण डिझेल या दोन्ही इंधनाचे दर देशात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पेट्रोल आण डिझेलचे दर राज्यात स्थिर होते. पण गुरुवारी त्यामध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ५० डॉलर इतके खाली उतरले होते. त्यामध्ये आता वाढ होऊ लागली असून ते दर प्रति बॅरल ६० डॉलरच्या वर जाऊ लागले आहेत. त्यामुळे अपेक्षितपणे त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. 


कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे त्याचा फायदा देशातील सर्वसामान्यांना मिळाला. पण आता जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत जाणार असतील, तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागेल, असे तेल कंपनीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.