लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ
सौदी अरामकोवर ड्रोनने झालेल्या हल्ल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही झाला आहे.
मुंबई : सौदी अरामकोवर ड्रोनने झालेल्या हल्ल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही झाला आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. शुक्रवारी पेट्रोलचे भाव ३५ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी वाढले आहेत. मागच्या ४ दिवसात पेट्रोलचे भाव १.०३ रुपयांनी आणि डिझेल ८६ पैशांनी महागलं आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल ७८.७३ रुपये आणि डिझेल ६९.५४ रुपये प्रती लीटर मिळत आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोल ७३.०६ रुपये आणि डिझेल ६६.२९ रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल ७५.७७ रुपये आणि डिझेल ७८.७३ रुपये चेन्नईमध्ये पेट्रोल ७५.९४ रुपये आणि डिझेल ७०.०८ रुपये आहे.
येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव १० डॉलर प्रती बॅरलने वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रुड ऑईलचे भाव ६३.८२ डॉलर प्रती बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रुड ५८.८२ डॉलर प्रती बॅरल आहेत.
सौदी अरामकोच्या दोन प्लांटवर ड्रोन हल्ला झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनात कमतरता आली आहे, त्यामुळे ही भाववाढ झाली आहे. ५ जुलै २०१९ नंतर पेट्रोल-डिझेलच्या भावातली ही मोठी भाववाढ आहे. बजेटमध्ये पेट्रोल डिझेलवरटी एक्साईज ड्यूटी आणि सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती अडीच रुपयांनी वाढल्या होत्या.